पटलं तर घ्या नाहीतर राहू द्या

काल एक लेख वाचला कबुतरांमुळे दमा वगैरे विकार आणि काही काही
रस्त्याने जातांना कबुतर उडतांना दिसलं की मला दमा याला होती . एकतर रस्त्याने जातांना माझ्या डोक्यात सर्वात जास्त विचार येतात . काळे केस धड्यात (इयत्ता दहावी ) ना सी फडकेंना दाढी करताना सुचायचे तसे मला गाडी चालवताना सुचतात . मग तेव्हा असे वाटते की ऋतुंबरा वगैरे प्रसन्न झाली की काय . एवढा विचारांचा धबधबा प्रपातासारखा कोसळतोय !! यामुळे पुण्य नागरीतल्या रस्त्यांवरून अनेकदा गाडीवरून आपटलो देखील आहे (अनेकदा म्हणजे ५ वेळा फक्त ) . त्यात हा भूतदया हा विषय .
मला भुतांविषयी सिलेक्टिव्ह दया असणाऱ्या लोकांविषयी अगदीच ममत्व आहे . इतकं आहे की फक्त हमरातुमरीवर भांडण व्हायचं बाकी असतं .
एक शेतकरी म्हणून भाकड गायांच करायचं काय हा प्रश्न आम्हाला पडतोच !! तसाच प्रश्न कुत्र्यांचा . सोसायटीत कुत्रा पाळणाऱ्यांचा जाहीर सत्कार आयोजित करावा असं मला वाटतं . मुळात कुत्रा मांजर हि पाळीव प्राणी असली तरी त्यांचे मूळ वर्तन हे प्राण्यांचे आहे हे आम्ही का विसरतो . त्यांना हिंडण्या फिरण्यासाठी मोकळी जागा लागते तर ते चांगले राहतात असे का वाटत नाही या महानुभावांना !! आणि एवढेच प्राणी प्रेम उतू जात असेल तर मस्त २ एकर जागा गावाकडे घ्यावी , जमल्यास घर बांधावे आणि अगदी हत्ती उंट बैल घोडा आणि अगदी गाढव सुद्धा पाळावे . आमची हरकत नाही . एकतर कुत्रा हे जनावर अगदी भयंकर (मी जनावर म्हणू शकतो ना ? की हि सुद्धा प्राण्यांप्रती हिंसा ठरेल ?) मला लहानपणी १४ इंजेक्शन घेतल्याचे ठामपणे आठवते आहे आणि म्हणूनच कुत्र्यांप्रती माझे वाईट मत अगदी ठाम आहे . मागे कुणीतरी माझ्या शेजारच्या माणसाने कुत्रा पाळला . ते बिचारं सहा महिने रात्री जोराने भुंकत होतं (इवळत होतं ) !!! माझ्या वरती राहणाऱ्याचं नुकतंच लग्न झालं होतं , त्याची बायको या भेसूर प्रकाराने चांगलीच घाबरली . मग त्याने रीतसर कम्प्लेंट पोलीस स्टेशन मध्ये केली, आणि मग पुढचं रामायण तुम्हाला सांगायला नको . कुत्र्यावालयाला कुत्र्याची रवानगी संगोपन केंद्रात करावी लागली त्याचा भयंकर राग त्याने माझ्याकडे खदखदत व्यक्त केला . लोकांना भूतदया आहे की नाही . !! म्हटलं खरं आहे तुमचं . (खरंतर मीच कम्प्लेंट करणार होतो पण रिलेशन खराब व्हायला नको म्हणून काही बोललो नाही असं मनातल्या मनात मी म्हटलेलं मला लख्ख आठवतंय ) आणि हा शहाणा कुत्र्याला उपाशी टाकून डिसेंबर चे ४ दिवस गोव्यात दारू रिचवत होता ही कुठली किंगफिशरगिरी !!
असो तर मुद्दा होता कबुतरांचा . कबुतर हि जात मुळात उपद्रवी . म्हणजे ती वळचणीला गुटुर गुटुर करतात अर्थात काही झेड ब्रिजच्या सावलीला कुजबुज करत बसतात(ही अक्षरशः वेगळी जमात आहे ) !!. असो
लोकांना भुतांविषयी अर्थात प्राणी पक्षयांविषयी असलेले ममत्व हा मूळ मुद्दा आहे . कबुतरांना दाणे टाकल्याने समृद्धी येते हे ज्याने शोधले ना त्याला खरंतर एखादा प्राज्ञ पुरस्कार देऊन सत्कार करायला हवा !! त्यांना बिचाऱ्यांना खायला अन्न कुठून मिळणार असा शहाजोग पणा करणाऱ्यांच्या डोक्यात कावळे चिमण्या बगळे साळुंक्या काय खात असतील हा गहाण प्रश्न पडत नसेल का बरं !!!
खरं तर कबुतरांना खायला म्हणून गॅलरीत दाणे ठेवणारे स्वतःसोबतच घरातील अन्यत्राचेही आरोग्य धोक्यात आणतात . कबुतरांना दाणेच टाकायचे तर टेकडीवर ३-४ किलो धान्य घेऊन गेलात आणि मूठ मूठ भिरकावली तर इतर पक्षीही आनंदाने पार्टी करतील .
मानवीय वस्तीत कबुतरांसारखे पक्षी व्हप्पा घेऊन येतात जे लहान मुलांना चावल्या तर व्रण तयार होतात , दम्यासारखा त्रास तर तुम्ही वाचलाच असेल . मनुष्य हा समाजशील प्राणी आहे आणि समाजात इतर मनुष्य प्रांण्यांना शक्य तितका त्रास न देणं हा त्याचा स्थायीभाव असावा . कबुतरासारखी खाजशील प्राणी जवळपास नको असतील तर एक दाणे टाकू नका दोन त्यांना बसायला जागा होईल असे खोपे ठेवू नका .
अर्थात कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी वगैरे प्रश्न मला पडत नाही . *पटलं तर घ्या नाहीतर राहू द्या* तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला