क्रॉस वर्ड स्टोरी कथा क्र 21

 मी रूमवर आल्या आल्या किशोरला फोन लावला , तो मिटिंग मध्ये होता . त्याने कट केला . मग मी सविताला फोन लावला . ती माझ्याकडेच यायला निघाली होती . नोटबुक हवी होती तिला . ती  येतांना मॅग्गी घेऊन आली , आईने शेंगदाण्याची चटणी बनवून दिली होती . मग आम्ही मस्त मॅग्गी बनवली वरतून शेंगदाणा चटणी टाकली आणि मस्त गप्पा मारत बसलो . 

बोलता बोलता रोशन चा विषय निघाला . ती त्याला आतल्या गाठीचा म्हणायची . त्याच्या घरी मी  गेल्याचं सांगितलं , ती हसत म्हणाली मग काय कसं वाटलं घर आणि घरातील माणसं  ? 

मी आहे ते सांगितलं , घर अगदी सुंदर आहे पण त्याची आई आणि ... 

मी बोलता बोलता थांबले .  कारण सविताचे वडील आणि रोशन चे वडील चांगले मित्र होते . 

सविताने माझ्या बोलण्यातील गोम हेरली आणि म्हणाली वेड्यांच्या दवाखान्यात काम करता करता वेडा झालेला माणूस आहे श्रीकांत जगताप 

मी म्हणले म्हणजे ? 

ती म्हणाली काही नाही सांगण्याजोगं नाही , आपल्या विचार शक्तीपलीकडचं आहे . 

असं म्हटल्यावर माझी उत्सुकता अजून चाळवली गेली . 

सर्वसामान्य माणसांचा हाच प्रॉब्लेम असतो , लफडं म्हटलं की उत्सुकता अधिक वाढते . त्यात श्रीमंतांची लफडी म्हणजे आमच्यासारख्या  गरीब मध्यमवर्गीयांसाठी चर्चेचा आवडता विषय . 

उगाच का मर्डर मिस्त्री आणि अफेअर लोकांच्या करमणुकीचे आवडते टॉपिक आहेत . 

किशोर चा फोन आला आणि सविताच्या ओठांवर आलेला  आमचा विषय थांबला . ती म्हणाली उचल उचल , तुला राहवणार नाही आणि माझ्या बोलण्याकडे धड लक्षही राहणार नाही . मी म्हटलं सॉरी ग  आणि फोन उचलला . कऱ्हा नदीपात्रातील वाळू उपसा थांबवण्याची जबाबदारी काही लोकांची टीम करून निश्चित करण्यात आली आणि त्या टीम मध्ये समावेश करण्यात आला होता . थोडे टेन्शन आले होते त्याला . पण शेवटी ड्युटी होती . वाळू माफियांची त्या भागात दहशत होती . पुस्तकांत वाचतो आपण डॅशिंग कारवायांबाबत , ही गुंडगिरी थांबली पाहिजे , सरकारने काही केलं पाहिजे अश्या आपल्या अपेक्षा असतात . पण प्रत्यक्षात स्वतःवर वेळ येते तेव्हा कुटुंब आणि स्वतःवर प्रचंड मानसिक तणाव असतो . 

तलाठी तहसीलदार यांच्यावर वाळूचा ट्रक ट्रॅक्टर चालवल्याच्या कितीतरी घटना ऐकत असतो . 





No comments:

Post a Comment