क्रॉसवर्ड 20

 किशोर ला काम होतं, पालक मंत्र्यांनी सगळ्या तलाठी तात्यांची मिटिंग बोलावली होती . त्यामुळे तो अर्ध्या तासात लगेच गेला. मी रुबिनाचे वडील आणि रोशन उरलो . एव्हाना 3 वाजले होते .  रोशन म्हणाला इथून माझे घर जवळच आहे , आपण माझ्या घरी जाऊ मग तुला मी रुमवर सोडतो . रुबिनाचे वडील पण म्हणाले बेटा मी आहे इथे तू जा रूमवर. मी रोशन ला म्हटले आपण डायरेक्ट रुमवर जाऊ तुझ्या घरी येऊ सगळे कधीतरी . पण तो ऐकेना शेवटी मी तयार झाले .  रोशन ची आलिशान कार झपकन फटकात शिरली , घर कसले महालच होतं रोशन चं घर म्हणजे. 

भव्य महालाचा दरवाजा बागेत काम करत असलेल्या माणसाने पटकन पळत जाऊन उघडला. आत मध्ये भलंमोठं झुंबर होतं सोफा आणि काय काय , कुठल्याश्या मुव्हीची शूटिंग सुद्धा झाली होती म्हणे घरात . मी चाचरत सोफ्यावर गोळा होऊन बसले . त्यालाही जाणवले असावे , तो म्हणाला रिलॅक्स . घरातून एक महिला पाणी घेऊन आली .  मी पाणी घेतलं त्याने तिला सांगितलं मॅडमना चहा आवडतो मस्त दोन कप चहा बनव. एवढे सांगून तो मी पाच मिनिटांत येतो फ्रेश होऊन म्हणून झपझप वरती गेला  . ती महिला लगबगीने किचन कडे धावली . चहा आणि कुकीज घेऊन थोड्या वेळात हजर झाली . आयुष्यात गर्भश्रीमंती पहिल्यांदाच अनुभवत होते .  तो म्हणाला जेवण काय घेणार ? मी म्हटलं रोशन पुन्हा कधीतरी येईन पण आत्ता नको.  प्लिज आग्रह करू नकोस. तो म्हटला ठीक आहे .  

तेवढ्यात एक कपल पायऱ्या वरून खाली येतांना दिसलं , एक वयस्कर बाई  पण गोरीपान देखणी आणि साधारण त्याच वयाचा माणूस , तिचा नवरा असावा असं वाटलं . तिने  सॅटीन गाऊन घातला होता . शब्द कोडे सोडवत होते वाटतं कारण त्याच्या हातात पेपर होता आणि एका शब्दावरून त्यांचा गमतीशीर वाद चालू होता . 

ते माझ्या जवळ आले तशी मी चटकन उठून उभी राहिली . ती महिला मला म्हणे बस बस.. रोशन ची क्लासमेट आहे का ? मी म्हटलं हो . छान छान एवढं म्हटली आणि दोघे पुन्हा सोफ्याच्या कोपऱ्यात छोटा टेबल ओढून बसले अगदी खेटून. 

रोशन आला मला म्हणाला चल झालंय माझं आवरून ,मॉम चल येतो ग ..काका येतो रे... तिनेही त्याच्याकडे छान स्माईल दिली आणि म्हणाली लवकर ये.

मी पण निरोप घेतला आणि बाहेर पडलो . मी सहजच त्याला विचारलं काकू होत्या का रे तुझ्या ? तो हसला आणि म्हणाला नाही, आई आहे ती माझी .

काय?? मनातल्या मनात ओरडले मी ...पण शांत बसले ,माझ्या चेहऱ्यावर अनेक प्रश्नांची जंत्री त्याला स्पष्ट दिसत होती. पण त्यानेही विषय वाढवला नाही आणि मी पण. 

हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली . 





No comments:

Post a Comment